अद्भुत ! रामायण ! सर्ग द्वितीय - अर्थ सहित, Adbhut Ramayana Canto 2 - with Hindi meaning

अद्भुत ! रामायण ! सर्ग द्वितीय - अर्थ सहित

भगवतो नारायणस्य अम्बरीषवरप्रदानम् -भगवान नारायण द्वारा अम्बरीष को वरदान देना -

Adbhut Ramayana Canto 2 - with Hindi meaning

अद्भुत ! रामायण ! सर्ग द्वितीय

भरद्वाज ! शृणुष्वाथ रामचन्द्रस्य धीमतः ।
जन्मनः कारणं विप्र ! इक्ष्वाकुकुलवारिधौ ॥ १ ॥

सीतायाश्च महादेव्याः पृथिव्यां जन्महेतुकम् ।
तत्र रामकथामादौ वक्ष्यामि मुनिपुङ्गव ॥ २ ॥

अद्भुत ! रामायण ! सर्ग द्वितीय  - अर्थ सहित
हे विप्र भरद्वाज ! इक्ष्वाकुकुलरूपी समुद्रामध्ये बुद्धिमान रामचंद्राने कोणत्या कारणाने जन्म घेतला, ते ऐक. तसेच देवी सीतेचाही या पृथ्वीवर कोणत्या हेतूने जन्म झाला तेही एक. आता हे मुनिश्रेष्ठा, आधी मी तुला राम कथा सांगतो. १-२

श्रूयतां मुनिशार्दूल अम्बरीषकथाश्रयम् ।
पुरुषोत्तममाहात्म्यं सर्वपापहरं परम् ॥ ३ ॥
अर्थ सहित
हे मुनीवरा, प्रथम अंबरीश कथा श्रवण कर. ती सर्व पापांचा नाश करणारी, श्रेष्ठ पुरुषोत्तमाचे माहात्म्य वर्णन करणारी आहे. ३

त्रिशंकोर्दयिता भार्या सर्वलक्षणशोभिता ।
अम्बरीषस्यजननी नित्यशोचसमन्विता ॥ ४ ॥
अर्थ सहित
त्रिशंकूची प्रिय पत्नी आणि अंबरीषाची माता अत्यंत सुलक्षणी आणि निष्कलंक, पवित्र होती. ४

योगनिद्रासमारुढं शेषपर्यङ्कशायिनिम् ।
नारायणं महात्मानं ब्रह्माण्डकमलोद्‌भवम् ॥ ५ ॥

तमसा कालरुद्राख्यं रजसा कनकाण्डजम् ।
सत्वेन सर्वगं विष्णुं सर्वदेवनमस्कृतम् ॥ ६ ॥
अर्थ सहित
योगनिद्रा मग्न, शेषशायी महात्मा भगवान विष्णू नारायण सर्व विश्व (ब्रह्मांड) आणि ब्रह्मदेवाचे निर्माते आहेत. ते तमोगुणाने युक्‍त असल्याने कालरूद्र, रजोगुणाने युक्‍त असल्याने ब्रह्मा आणि सत्वगुणाने युक्त असल्याने विष्णूरूप असून सर्व देवता त्यांना वंदन करतात. ५-६

अर्चयामास सततं वाङ्मनःकायवृत्तिभिः ।
माल्यदामादिकं सर्वं स्वयमेव व्यचीकरत् ॥ ७ ॥
अर्थ सहित
त्रिशंकूची पत्नी काया-वाचा-मनाने त्या विष्णूची आराधना करीत असे. तसेच (पूजेसाठी लागणाऱ्या) हार, माळा इ. स्वतः तयार करीत असे. ७

गन्धादिपेषणञ्चैव धूपद्रव्यादिकं तथा ।
तत्सर्वं कौतुकाविष्टा स्वयमेव चकार सा ॥ ८ ॥
अर्थ सहित
गंध उगाळणे, धूप-प्रज्वलन इ. सर्व गोष्टी ती स्वतः आनंदाने करीत असे. ८

शुभा पद्मावती नित्यं वचो नारायणेति वै ।
अनन्तेति च सा नित्यं भाषमाणा यतव्रता ॥ ९ ॥
अर्थ सहित
ती शुभलक्षणी व्रतस्थ पद्मावती (जणू काही लक्ष्मीच) 'नारायण-नारायण', 'अनंत-अनंत' असे सतत नामोच्चार करीत असे. ९

दशवर्षसहस्राणि तत्परेणान्तरात्मना ।
अर्चयामास गोविन्दं गन्धपुष्पादिभिः शुभैः ॥ १० ॥
अर्थ सहित
अशाप्रकारे दहा हजार वर्षे अत्यंत तद्रूप होऊन, मनःपूर्वक, गंध-पुष्प आदींच्या सहाय्याने ती गोविंदाची पूजा करीत होती. १०

विष्णुभक्तान्महाभागान् सर्वपापविवर्जितान् ।
दानमानार्चनैर्नित्यं धनैरत्‍नैरतोषयत् ॥ ११ ॥
अर्थ सहित
सर्व पापरहित अशा श्रेष्ठ विष्णूभक्तांना ती धन-दान पूजा इ. ने संतुष्ट करीत असे. ११

ततः कदाचित्सा देवी द्वादश्यां समुपोष्य वै ।
हरेरग्रे महाभागा सुष्वाप पतिना सह ॥ १२ ॥‌
अर्थ सहित
एकदा द्वादशीचे व्रत करून ही देवी पतीसह हरीच्या मूर्ती समोर झोपली होती. १२

तत्र नारायणो देवस्तामाह पुरुषोत्तमः ।
किमिच्छसि वरं भद्रे मत्तः किं ब्रूहि भामिनि ॥ १३ ॥
अर्थ सहित
तेव्हां श्रीनारायण तिला म्हणाले - 'हे भामिनी ! तुला माझ्याकडून कोणता वर हवा आहे, सांग.' १३

सा दृष्टवा तं वरं वव्रे पुत्रस्त्वद्‌भक्तिमान्भवेत् ।
सार्वभौमो महातेजाः स्वकर्मनिरतः शुचिः ॥ १४ ॥
अर्थ सहित
त्याला पाहून तिने असा वर मागितला की - महान तेजस्वी, सार्वभौम, आपल्या कर्तव्यात तत्पर असणारा आणि तुझी भक्ती करणारा असा उत्तम पुत्र मला व्हावा. १४

तथेत्युक्त्वा ददौ तस्यै फलमेकं जनार्दनः ।
सा प्रबुद्धा फलं दृष्ट्वा भर्त्रे सर्वं निवेद्य च ॥ १५ ॥
अर्थ सहित
'ठीक आहे' असे म्हणून जनार्दनाने तिला एक फळ दिले. सकाळी जागे झाल्यानंतर तिला ते फळ दिसले. आणि तिने आपल्या पतीला त्या फळाबद्दल सर्व काही सांगितले. १५

भक्षयामास संहृष्टा फलं तद्‌गतमानसा ।
ततः कालेन सा देवी पुत्रं कुलविवर्द्धनम् ॥ १६ ॥

असूयत शुभाचारं वासुदेवपरायणम् ।
शुभलक्षणसम्पन्नं चक्राङ्कितमनुत्तमम् ॥ १७ ॥
अर्थ सहित
अतिशय आनंदित होऊन, मनःपूर्वक तिने ते फळ खाल्ले. त्यानंतर काही काळाने तिने एका अत्यंत सुलक्षणी, सदाचारी, वासुदेवपरायण, कुळाची किर्ती वाढविणारा, आणि शंखचक्र आदि शुभ लक्षणांनी युक्त अशा सुपुत्राला जन्म दिला. १६-१७

जातं दृष्ट्वा पिता पुत्रं क्रियाः सर्वाश्चकार वै ।
अम्बरीष इति ख्यातो लोके समभवत्प्रभुः ॥ १८ ॥
अर्थ सहित
मुलाचा जन्म झाल्यानंतर पित्याने योग्य ते संस्कार त्याच्यावर केले, आणि त्यानंतर तो मुलगा 'अंबरीष' या नावाने सर्व लोकात विख्यात झाला. १८

पितर्युपरते श्रीमानभिषिक्तो महात्मभिः ।
मंत्रिष्वाधाय राज्यं च तप उग्रं वकार सः ॥ १९ ॥

संवत्सर सहस्रं वै जगन्नारायणं प्रभुम् ।
हृत्पुण्डरीकमध्यस्थं सूर्यमण्डलमध्यगम् ॥ २० ॥
अर्थ सहित
वडील स्वर्गवासी झाल्यानंतर श्रेष्ठींनी त्याला राज्याभिषेक केला व नंतर मंत्र्यांवर राज्यकारभार सोपवून त्याने उग्र तप केले, आणि हजार वर्षे हृदय कमळातील मध्यात असणाऱ्या प्रभू नारायणाचा जप केला. १९-२०

शंखचक्रगदापद्मं धारयन्तं चतुर्भुजम् ।
शुद्धजाम्बूनदनिभं ब्रह्मविष्णुशिवात्मकम् ॥ २१ ॥

सर्वाभरणसंयुक्तं पीताम्बरधरं प्रभुम् ।
श्रीवत्सवक्षसं देवं पुरुषं पुरुषोत्तमम् ॥ २२ ॥

ततो गरुडमारुह्य सर्वदेवैरभिष्टुतः ।
आजगाम स विश्वात्मा सर्वलोकनमस्कृतः ॥ २३ ॥
अर्थ सहित
त्यानंतर शुद्ध सोन्याप्रमाणे तेजस्वी, सर्व आभूषणे धारण करणारा आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युक्त असा पितांबरधारी, चतुर्भुजा पुरुषोत्तम गरुडावर आरूढ होऊन तेथे प्रगट झाला. वक्षःस्थळावर श्रीवत्स धारण करणाऱ्या त्या प्रभूची सर्व लोकांनी नमस्कार करून स्तुती केली. २१-२३

ऐरावतमिवाचित्य कृत्वा वै गरुडं हरिः ।
स्वयं शक्र इवासीनस्तमाह नृपसत्तमम् ॥ २४ ॥
अर्थ सहित
त्यानंतर गरुडाला ऐरावता प्रमाणे मानून आणि स्वतःला इंद्र समजून (इंद्राचे रूप घेऊन) तो त्या नृपश्रेष्ठाला बोलला - २४

इन्द्रोऽहमस्मि भद्रं ते किं ददामि तवाद्य वै ।
सर्वलोकेश्वरोऽहं त्वां रक्षितुं समुपागतः ॥ २५ ॥
अर्थ सहित
'मी इंद्र आहे. तुझे कल्याण असो. तुला मी काय देऊ ?' मी सर्व लोकांचा ईश्वर असून तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. २५

अम्बरीषस्तु तं दृष्ट्वा शक्रमैरावतस्थितम् ।
उवाच वचनं धीमान् विष्णुभक्तिपरायणः ॥ २६ ॥
अर्थ सहित
ऐरावतावर बसलेल्या इंद्राला पाहून तो बुद्धिमान विष्णुभक्त परायण अंबरीश म्हणाला - २६

नाहं त्वामभिसन्धाय तप आतिष्ठवानिह ।
त्वया दत्तञ्च नेच्छामि गच्छ शक्र यथासुखम् ॥ २७ ॥
अर्थ सहित
'मी तुला उद्देशून, तुला प्रसन्न करण्यासाठी तप केले नव्हते. तेव्हा हे इंद्रा ! आनंदाने परत जा. मला तुझ्याकडून काही नको.' २७

मम नारायणो नाथस्त्वां नस्तोष्येऽमराधिप ।
व्रजेन्द्र मा कृथास्त्वत्र ममाश्रमविलोपनम् ॥ २८ ॥
अर्थ सहित
हे देवाधिदेवा ! माझा देव तर नारायण आहे. मला तुझ्याकडून काही नको. तर हे इंद्रा ! निघून जा. माझा वेळ व्यर्थ घालवू नको. २८

ततः प्रहस्य भगवान् स्वरूपमकरोद्धरिः ।
शार्ङ्गचक्रगदापाणिः शङ्खहस्तो जनार्दनः ॥ २९ ॥
अर्थ सहित
तेव्हा भगवान विष्णूने हसून शंख -चक्र-गदा-धनुष्य धारण करणारे असे आपले मूळ रूप धारण केले. २९

गरुडोपरि विश्वात्मा नीलाचल इवापरः ।
देवगन्धर्वसंघैश्च स्तूयमानः समन्ततः ॥ ३० ॥
अर्थ सहित
त्यावेळी देव-गंधर्वांचे समुदाय त्यांची स्तुती करीत होते. दुसऱ्या नील पर्वताप्रमाणे शोभून दिसणारे ते भगवान विश्वात्मा गरुडावर आरूढ झाले होते. त्यांना पाहून संतुष्ट झालेल्या राजाने त्यांना नमस्कार केला आणि त्या गरुडध्वजाची तो स्तुती करू लागला. ३०

अद्भुत ! रामायण ! सर्ग द्वितीय नारायण स्तुति

प्रणम्य राजा सन्तुष्टस्तुष्टाव गरुडध्वजम् ।
प्रसीद लोकनाथस्त्वं मम नाथ जनार्दन ॥ ३१ ॥

कृष्ण कृष्ण जगन्नाथ सर्वलोकनमस्कृत ।
त्वमादिस्त्वमनादिस्त्वमनन्तः पुरुषः प्रभुः ॥ ३२ ॥
अर्थ सहित
'हे कृष्णा, जनार्दन, जगन्नाथा तू माझ्यावर प्रसन्न हो. हे जगन्नाथा, जनार्दना सर्व लोकांनी तुला नमस्कार केला आहे. तू आदि, अनादी आणि अनंत आहेस. तुझ्यापासूनच जगाचा प्रारंभ आणि तुला शेवटही नाही. तू सर्वश्रेष्ठ आहेत.' ३१-३२

अप्रमेयो विभुर्विष्णुगोविन्दः कमलेक्षणः ।
महेश्वरांशजो मध्यः पुष्करः खगमः खगः ॥ ३३ ॥
अर्थ सहित
तुझी गणना करणे कठीण(अप्रमेय), तू कमललोचना, बलिष्ठ महेश्वराचा अवतार, सेनानायक पुष्कर आहेस. ३३

कव्यवाहः कपाली त्वं हव्यवाहः प्रभञ्जनः ।
आदिदेवः क्रियानन्दः परमात्मनि संस्थितः ॥ ३४ ॥
अर्थ सहित
आकाशगामी, अग्नि (कव्यवाह, हव्यवाह), प्रभांजन (वादळरूप), कपाली असून परमात्म्यात स्थित आहेस. ३४

त्वां प्रपन्नोऽस्मि गोविन्द पाहि मां पुष्करेक्षण ।
नान्या गतिस्त्वदन्या मे त्वामेव शरणं गतः ॥ ३५ ॥
अर्थ सहित
हे कमललोचना, गोविंदा, मी तुला शरण आलो आहे. माझे रक्षण कर. तुझ्या शिवाय मला दुसरा कोणताच आश्रय नाही.' ३५

अद्भुत ! रामायण ! सर्ग २ 

तमाह भगवान् विष्णुः किं ते हृदि चिकीर्षितम् ।
तत्सर्वं सम्प्रदास्यामि भक्तोऽसि मम सुव्रत ॥ ३६ ॥
अर्थ सहित
भगवान विष्णु त्याला म्हणाले - हे सुव्रता ! तुझी कोणती इच्छा आहे ? मी तुला सर्व काही देईन. त्यासाठीच मी इथे आलो आहे. ३६

भक्तप्रियोऽस्मि सततं तस्माद्दातुमिहागतः ।
अम्बरीषस्तु तच्छ्रुत्वा हर्षगद्गदया गिरा ॥ ३७ ॥

प्रोवाच परमात्मानं नारायणमनामयम् ।
त्वयि विष्णौ परानन्द नित्यं मे वर्त्ततां मतिः ॥ ३८ ॥

भवेयं त्वत्परोनित्यं वाङ्मनः कायकर्मभिः ।
पालयिष्यामि पृथिवीं कृत्वा वै वैष्णवं जगत् ॥ ३९ ॥

यज्ञहोमार्चनैश्चैव तर्पिष्यामि सुरोत्तमान् ।
वैष्णवान् पालयिष्यामि हनिष्यामि च शात्रवान् ॥ ४० ॥
अर्थ सहित
ते ऐकून अंबरीश आनंदातिरेकाने नारायण परमात्म्याला म्हणाला - 'हे विष्णू तू आनंदाचे निधान आहेस. माझी बुद्धी तुझ्या ठायी होवो. काया वाचा मनाने मी तुझ्याशी एकरूप व्हावे. पृथ्वी विष्णुमय करून मी तिचे पालन करीन. यज्ञ होम पूजा-अर्चना करून मी देवांना संतुष्ट करेन. विष्णू भक्तांचे पालन आणि असुरांचा नाश करीन.' ३७-४०

एवमुक्तस्तु भगवान् प्रत्युवाच नृपोत्तमम् ।
एवमस्तु तवेच्छा वै चक्रमेतत्सुदर्शनम् ॥ ४१ ॥

पुरा रुद्रप्रभावेन लब्धं वै दुर्लभं मया ।
ऋषिशापादिकं दुःख शत्रु रोगादिकं तथा ॥ ४२ ॥
हिंदी अर्थ सहित
राजाने असे म्हटल्या नंतर भगवान त्या राज्यश्रेष्ठाला म्हणाले - 'तुझ्या इच्छेप्रमाणेच होवो. हे सुदर्शनचक्र प्राप्त होण्यास अतिशय कठीण; पण रुद्राच्या प्रभावाने पूर्वी ते मला मिळाले. ऋषींचे शाप, रोग शत्रूची पीडा इ. तुझे दुःख ते नाहीसे करेल.' असे म्हणून ते अंतर्धान पावले. ४१-४२

निहनिष्यति ते दुःखमित्युक्त्वान्तरधीयत ।
ततः प्रणम्य मुदितो राजा नारायणं प्रभुम् ॥ ४३ ॥

प्रविश्य नगरीं दिव्यामयोध्यां पर्यपालयत् ।
ब्राह्मणादींस्तथा वर्णान् स्वे स्वे कर्मण्ययोजयत् ॥ ४४ ॥
अर्थ सहित
तेव्हा राजाने अत्यंत आनंदित होऊन प्रभू नारायणाला नमस्कार केला आणि अयोध्या नगरीत येऊन तो तिचे पालन करू लागला. ब्राह्मणादि सर्व वर्णांनाही त्याने आपापल्या कामात नियुक्त केले. ४३-४४

नारायणपरो नित्यं विष्णुं भक्तानकल्मषान् ।
पालयामास हृष्टात्मा विशेषेण जनाधिपः ॥ ४५ ॥
अर्थ सहित
तो राजा नारायणाशी एकरूप होऊन मोठ्या आनंदाने, विशेषेकरून विष्णू भक्तांचे पालन करू लागला. ४५

अश्वमेधशतैरिष्ट्वा वाजपेयशतैरपि च ।
पालयामास पृथिवीं सागरावरणामिमाम् ॥ ४६ ॥
अर्थ सहित
शंभर अश्वमेध आणि शंभर वाजपेय यज्ञ करून (सागर हेच तट असणाऱ्या) सागरापर्यंत पसरलेल्या पृथ्वीचे पालन करू लागला. ४६

गृहे गृहे हरिस्तस्थौ वेदघोषो गृहे गृहे ।
नामघोषो हरेश्चैव यज्ञघोषस्तथैव च ॥ ४७ ॥
अर्थ सहित
त्यावेळी घरोघरी विष्णूची प्रतिष्ठापना होऊन प्रत्येक घरामध्ये वेदघोष होत होता. ४७

अभवन्नृपशार्दूले तस्मिन् राज्यं प्रशासति ।
नासस्या नातृणा भूमिर्न दुर्भिक्षादिभिर्युता ॥ ४८ ॥
अर्थ सहित

तो राजा जोपर्यंत राज्य करीत होता, तोपर्यंत भूमी धनधान्यसंपन्न होती; दुष्काळाचे नावही नव्हते. प्रजा निरोगी आणि पीडामुक्त होती. ४८

रोगहीना प्रजा नित्यं सर्वोपद्रववर्जिता ।
अम्बरीषो महातेजाः पालयामास मेदिनीम् ॥ ४९ ॥

स वै महात्मा सततं च रक्षितः सुदर्शनेन प्रियदर्शनेन ।
शुभां समुद्रावधिसन्ततां महीं सुपालयामास महींमहीन्द्रः ॥ ५० ॥
अर्थ सहित
महातेजस्वी अंबरीश पृथ्वीचे पालन करीत होता. सुदर्शनचक्राकडून उत्तम प्रकारे संरक्षण मिळालेला तो महात्मा चारही समुद्रापर्यंत विस्तार पावलेल्या पृथ्वीचे पालन उत्तम रीतीने करीत असे. ४९-५०
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्‌भुतोत्तरकाण्डे अम्बरीषवरप्रदानं नाम द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
भगवतो नारायणस्य अम्बरीषवरप्रदानम् - सर्ग दुसरा समाप्त

टिप्पणियाँ